दुसरीत असेन मी तेंव्हा, मास्तरांनी धडा दहादा वाचून आणायला सांगितला. वाचत होती मी. बाबा म्हणाले, 'काय करुन राहिली, बराच वेळ झाला'? मी सांगितले, दहादा धडा वाचायला सांगितला आहे. अगं, तुला येत असेल वाचता तर १० दा वाचायची गरज काय? न येणाऱ्यांसाठीचा तो अभ्यास असतो, प्रमोद म्हणाला. खूप आनंद झाला. आपल्याला येत असेल तर मास्तरचे ऐकायची गरज नाही. पहिला धडा मी शिकली! पण त्यातून मला सुचले बरं का- की दुसरा धडा वाचून पाहू या. दुसराही धडा वाचता आला! कोण आनंद! मनाशीच मी हसायला लागले. मला ती सवय आजही आहे.सारे पुस्तक वाचून झाले. नवीन नवीन शब्द, त्यांचे अर्थ, वाक्यरचना, भाषा- सर्वांचेच आकर्षण व पुस्तकाशी खिळवून ठेवणारा आनंद! उड्या मारायचीही सवय लागली. धडेच धडे शिकली.आता लिहून पाहू या, लिहिले. अक्षरही घोटीव यायला लागले, शुध्दलेखनही जमले. आता दोरीवरच्या उड्या वाढल्या! मग ठरविले- वाचता,लिहिता तर आले! जे वाचले ते सांगता येते का ते पाहूया. मनाशीच बडबड वाढली. वेगळ्या खोलीत जाऊन बडबडतच राहिले. कुणी पाहिले असते तर पागलच म्हंटले असते ! तशीही मी या सर्व बाबतीत पागलातच जमा होण्याजोगती आहे, आणि त्याचा मला आनंद आहे. आता लंगडी, टिक्करबिल्ला, लपाछपी असे खेळ वाढले.खेळता-खेळता दुखापती झाल्या तरी आनंद कायमच! किती मज्जाच मज्जा! एकट्याशी सांगता तर आले, आता समोर ऐकणारे आहेत आणि आपल्याला बोलायचे आहे. स्पर्धा आहे, परीक्षा आहे. बाबांनी लिहून दिलेले भाषण आहे. पाठांतर वाढले. जितके काही चांगले लिखाण, कविता दिसल्या त्या पाठ करायची आवड लागली.सुरुवातीला लटपट झाली, पण मग धिटाई वाढली! आता कुणी लिहून दिलेले कशाला बोलायचे? आपणच अभिव्यक्त व्हायचे की! कोण प्रगती! आता तर खो-खो खेळायला लागले. खो-खो च्या टीमची Captain झाले. पण बाबांनी खेळणे थांबविले. आता तर वेळच वेळ अभ्यासाला! माणसाला आवड असली ना की तो कितीही वाचू आणि लिहू व बोलू तर शकतोच ना? या सर्वांचा माझ्या आयुष्यात मला खूप फायदा झाला. एकच भाषा शिकून जर एवढा आनंद तर अनेक भाषा का नाही- असा विचार करणाऱ्यांना किती आनंद मिळू शकतो. विनोबा भावे जिथे जायचे तेथील भाषेचे व्याकरण शिकून ती भाषा अवगत करायचे व बोलूही शकायचे. पूर्व पंतप्रधान नरसिंह राव यांना अनेक भाषा अवगत होत्या. दुभाषांना किती महत्त्वाचे कार्य करायचे असते. अनुवाद करणाऱ्यांनाही फार महत्वपूर्ण कार्य करता येऊ शकते. न्यूटन बरोबरच बोलला होता, त्याला त्याचे ज्ञान वाळूच्या एका कणासारखे वाटले होते. जितके ज्ञान मिळवाल तितके थोडे. अनेक विषय, अनेक भाषा, अनेक संस्कृती, अनेक इतिहास! काय काय वाचणार तुम्ही एका आयुष्यात?
"वाचाल तर वाचाल"- डॉ. आंबेडकर. प्रत्येक विचारी माणूस वाचनाचा लोभी असतो. वाचनातून मिळणारा आनंद एक सर्वश्रेष्ठ आनंद आहे. सध्याच्या काळात 'वाचनकट्टा' तयार करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कारण इंटरनेटसारख्या माध्यमांमुळे, TV Channels वरील वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे वाचनाची सवय लुप्त झाल्यासारखीच झाली आहे. पण ज्यांना ही गोडी लागली तो त्याला चिकटूनच राहतो.
वाचन-सांगाती आयुष्य
आनंद-सांगाती करतो.
संगीता पाटखेडकर.
No comments:
Post a Comment