Saturday, 13 February 2016

आंतरिक काव्य

   "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे!" या गद्य आणि रोख पण भावनेने संपन्न वचनातील 'माझा' याचे विभूतिमत्व अहंलब्धीचे किती आणि आत्मलब्धीचे किती - हे कोणाही समंजसाच्या ध्यानी यायला भाषा, काव्यशास्त्रात्मक सूत्रप्रमेयांची जानपहचान आवश्यक नाही. लक्षणा-व्यंजना यांच्या घटपटात त्याचा भावार्थ कधीही गवसणार नाही. असला उद्गार सच्च्या अर्थाने एका विशिष्ट व्यक्तिमत्वाला स्फुरलेला असला तरी, तितक्याच अर्थाने तो अनेकांच्या समष्टि-जीवनाला छळणा-या आशा-आकांक्षांचा टिळा आपल्या माथी मिरवतो. 'ऊस डोंगा परि रसु नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा?' - चोखामेळा. किंवा 'ह्या नच मुंग्या, हीच माणसे, मने अनामिक जरि सा-यांची, लक्तरलेल्या मिनिटांचा वर सदैव बुरखा, लाज स्वतःची' - मर्ढेकर. यासारख्या भावोत्कट उद्गारातील प्रातिनिधिकता सहजच जाणवते. ती त्याची भावना असते, पण ती तुमच्या आमच्या अंतःकरणातून जाणारी असते. 'मुले तुमच्यामधून जन्मतात, इतकेच. ती तुमची नसतात!' अशा अर्थाचे खलील जिब्रानचे एक वचन आहे. ते कलावंतांच्या कृतीस लागू पडते
"अजुनी अपुरीच राहिली l खेळाची हौस हसत चांदण्यामधे l या आयुष्याच्या मम मरणोन्मुख शय्येवर" l - वि.दा. सावरकर म्हणतात तेव्हा त्या ओळी सर्वहृदयस्पर्शी होतात
"ऐसी वस्तु नसे इथे, करुनी देई, तुझा आठव l वस्तू स्मारक का हवी स्मृति जिथे l चित्ती करी ताण्डव" l - माधव ज्यूलियन. या ओळी प्रेमिकाला भावार्त करुन टाकतात. ही थरारुन सोडण्याची किमया ज्यांनी साधली आणि मुरवली त्यांनी कवितेची साधना जिंकलीच समजा! अशांच्या कवितेत 'नव्या-जुन्याचे, उण्या-पु-याचे, असे-नसेचे लग्न लागले चौफेर!' - हेच खरे
"हात मारिता अपुल्या भाळी l
 तिथेच फुटतो तिसरा डोळा l
आणि उमगतो मुशाफिराला l
अंधारातील तिसरा डोळा" l - बा.सी. मर्ढेकर. यातील 'तिसरा डोळा' ही प्रतिमा उमगली की कडव्याचे सौंदर्य अतिगुणित होते. 'शुद्ध स्फटिक'(ज्याच्या मनावर शिक्षणाचा काही संस्कार घडू शकत नाही असा मूर्ख) सारखे मराठीतील काही शब्द खूपच अनोखे आहेत. तसे थोडीच आपल्याला राहावयाचे आहे? 'नर्मदेतील गोटा' अगदी गुळगुळीत. त्याच्यावर पाणी ठरतच नाही. त्याचीच 'शाळिग्राम' म्हणून पूजा केली की त्याला किती महत्त्व प्राप्त होते? शब्दांची शक्ती अफाट असते. किती योग्य रितीने तुम्ही त्याचा उपयोग करता यावर भाव अवलंबून असतो. 'माराणु' चा अर्थ 'विष्णू, कृष्ण, राम' असा होतो हे सांगावेच लागेल. 'माकडमेवा' हा शब्द समजावूनच द्यावा लागेल.(विड्याची पाने, भुईमुगाच्या शेंगा, ऊस, खरबुजे, फळफळावळ . जिन्नस) काव्य समजून घ्यायला किंवा एकूणच साहित्याचा अर्थ लक्षात घेण्यासाठी अनेक शब्द माहीतच असावे लागतात; त्यातील भाव-भावनांपर्यंत पोहोचायला नंतर खूपच वेळ लागतो, पण प्रयत्न करता-करताच काव्य-साहित्य आकळते. नुसते वाचले की समजते असे नाही. कवीचे युग त्याच्या आयुष्यमानाला धरुन शंभर वर्षांइतके गाजले तरी महाप्रतापी ठरले असे समजावे. शंभरीचा आशिर्वाद म्हणजे खूप काही! त्याच्यामागून येणारा कोणी प्रामाणिक प्रतिभावंत प्रकटपणे त्याचे ऋण मानून त्याच्या पादुका मिरवतो. इमर्सन म्हणतोच ना - 'जग हे नेहमीच कवीची प्रतिक्षा करत असते'. 'केशवसुतांची तुतारी' अजूनपर्यंत गाजतेच आहे. प्राचीन अर्वाचीन काव्याचा पडताळा घेतला तर कितीतरी वचने रसिकांना मुखोद्गत का बरे होतात? त्या शब्दांत इतके सामर्थ्य की अंतरंगात घुसून ते शब्द भावजीवन व्यापून टाकतात.  
" या जन्माला फुटे भाषा
 निदान पुढच्या फुटेल का ती?
.......कधी लागेल गा नख l तुझे माझिया गळ्याला? आणि सामर्थ्याचा स्वर l माझिया गा व्यंजनाला"? - मर्ढेकर. हा शैव सौंदर्याचा ध्यास उत्कृष्ट कवितेला नेहमीच असतो
"ढळे ऊन, दिन उरला थोडा l
मागमूसही घरचा नाही l
थकले घोडे पाय टाकी l कशी गत होईल आज अगाई?
बावरुन मी बघे चहूकडे
शून्य दिशा मज दिसती दाही l
डोळे सदनाकडे लागले
कुणी सखा का नेईल पायी
अजुनि चालतोचि वाट l माळ हा सरेना l  विश्रांतिस्थल केंव्हा यायचे कळेना" l - रेंदाळकर. अशा सहजसुंदर भावाभिव्यक्तीने मराठी कविता समृध्द आहे

     संगीता पाटखेडकर.

      १३//२०१६.

No comments:

Post a Comment