आपली मराठी भाषा अत्यंत समृध्द, संपन्न व थोडक्या, निश्चित शब्दात अनेक अर्थांचा प्रसव करणारी मार्मिक भाषा आहे. परशुरामाने महादेवाला प्रसन्न करुन घेऊन त्याच्यापासून शिवधनुष्य मिळविले होते. २१ वेळा निःक्षत्रिय पृथ्वी करण्याचा जोरदार सपाटा त्याने लावला व शेवटी ते धनुष्य त्याने खाली ठेवले. सीता हे धनुष्य लीलया पेलत असे. सीतेच्या लग्नाचा पण जनकाने हे धनुष्य जो पेलेल त्याला ती वरेल असा लावला होता. रावणासारख्यांची फे फे उडाली होती. रामाने तो पण जिंकला. राम-सीता विवाह झाला. परशुरामाची अवतारसमाप्ती व रामाचे अवतारकार्य चालू झाले. पूर्ण आयुष्य शिवधनुष्य बनले. अत्यंत कठीण कार्य तडीला नेणे हा या वाक्प्रचाराचा वाच्यार्थ - अभिधा आहे.कितीही कठीण कार्य तडीला नेणे म्हणजे कोणकोणत्या समस्या पार करीत पूर्णत्वाला नेणे ही लक्षणा. शिव ही विरागी देवता. जगाचा संहार करणे ही या देवतेची नियती.(ब्रह्मदेव-निर्माता, विष्णू- पालनकर्ता व शिव- संहारकर्ता- या संकल्पना) तिसरा डोळा उघडण्याचे सामर्थ्य या देवतेत. जितका भोळा तितकाच रौद्ररुप धारण करुन विनाशक म्हणून रूद्र. स्मशानातील देवता. त्याचे धनुष्य संहारशस्त्र. ते पेलण्याची क्षमता. सारेच महाकर्मकठीण. हा व्यंग्यार्थ-व्यंजना. निर्मिति-संगोपन ह्या क्रिया आल्हादकारी पण विनाश, नष्टता ही क्रिया दुःख देणारी; पण यावरच जग चालू आहे. बीज फळते, फुलते, वृक्षसंभार निर्माण होतो व नंतर कोलमडतो ही चक्राकार सृष्टीनियती आहे. 'पूर्णोत्थापनकाल तोच पतनप्रारंभही होतसे' - बी कवी. शिखरावर पोचलेला माणूस नेहमी तिथे राहू शकत नाही. त्याला खाली यावे लागते. फळ खाली पडते- गुरुत्वाकर्षण. अनेकानेक अर्थांची व्युत्पत्ती शोधली की 'शिवधनुष्य पेलणे' यातील आनंद लक्षात येतो. अरुणला वाड्यावर लिहिण्याचे शिवधनुष्य पेलायचे आहे असा शब्दप्रयोग मी 'वाड्याचे संकीर्तन' या लेखात केला होता. लेख नुसता घाईघाईत वाचायचा नसतो व चांगला, वाईट प्रतिक्रिया द्यायची नसते. खोलातील अर्थ समजून घेऊन वाचले तरच वाचण्यातील व लिखाणातील आनंद कळतो. हे सा-या जीवनासाठी आहे. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात 'शिवधनुष्य' पेलत असतो. आयुष्य हे शिवधनुष्य आहे. आधी धनुष्यापर्यंत म्हणजे कठीण कार्यापर्यंत पोचा मग शिवापर्यंत म्हणजे आनंदी आनंद!
'अनंत अमुची ध्येयासक्ती
अनंत अन् आशा.....
किनारा, तुला पामराला'- म्हणणारा कोलंबस बघा.
('कोलंबसाचे गर्वगीत'-कुसुमाग्रज). कुसुमाग्रज बघा- एकसे एक कविता करुन काव्याचे प्रांगण अगदी रोशन करुन टाकले. कठीण कार्य समोर ठेवा व ते सिध्दतेला नेऊन आनंद मिळवा. मला लिखाणाचे शिवधनुष्य पेलायचे आहे. काय? जमेल ना?! भगीरथाने स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली व ती शेवटी प्रथम शंकराच्या जटेतच विसावली. समुद्रातून हलाहल निघाले; ते शंकराने प्राशन केले व नीलकंठ झाला. मस्तकावर चंद्र व गळ्यात सर्प धारण केला. स्वतः शंकरालाच किती- किती-काय-काय करावे लागले. स्वातंत्र्याचा इतिहास पाहता कितीकांनी प्राण पणाला लावले. आपल्या इतिहासात उदाहरणांची कमी नाही. शोधा व 'शिवधनुष्य पेलणे' चा आनंद लुटा.
संगीता पाटखेडकर.
No comments:
Post a Comment