'मन्मथ' नाम संवत्सरातील 'वसंतपंचमी' आत्ता माघ शुक्ल ४-५ तिथीने, दि. १२ फेब्रुवारी ला आहे. अमृतयोग आहे. आधल्या दिवशी तिलकुंद - गणेश जयंती - वरद चतुर्थी आहे. हा पूर्ण महिना निसर्गाच्या व धार्मिक दृष्टीने परिपुष्ट आहे. आत्ता ४ फेब्रुवारीला षटतिला एकादशी आहे. ६ प्रकारांनी या दिवशी तिळाचा उपयोग करावयाचा असतो. एकादशी म्हणजे विष्णूची आराधना. प्रत्येक दिवस आयुष्याला सिध्दता आणण्यासाठी महत्त्वाचा. १)
गजानन महाराज प्रकटदिन २) रामदासनवमी ३) महाशिवरात्र. अशासारख्या तेजस्वितेने संपन्न असा हा महिना. सूर्योपासनेने आयुष्यात आरोग्याचे व तेजाचे संवर्धन व्हावे म्हणून प्रयत्न करण्याचा महिना. सूर्यनमस्कारांचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. कुठेतरी मनावर बिंबविले जाते की शेवटी, 'शरीर माद्यं खलु धर्मसाधनम्' l निसर्गही उत्साहनिर्मिती करत असतो. परीक्षेचे वारे वाहू लागले असतात. विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असतात. कोणत्याही परीक्षेतील यशापयश आयुष्याची श्रेणी ठरवत असते. त्यादृष्टीने प्रत्येकाचे प्रयत्न चालू असतात. वसंतपंचमीला 'काम' व 'रति' यांची पूजा करावी असे पंचांग सांगते. प्रेमीजनांना पर्वणीच लाभते. १४ फेब्रुवारीला 'Valentine Day'. २८ फेब्रुवारीला 'राष्ट्रीय विज्ञान दिवस'. वसंत हा ऋतूंचा राजा आहे. झाडांना नवीन पालवी फुटते. आयुष्याची मरगळ टाकून देऊन पल्लवित, उत्साहित होऊन फळावे, फुलावे, मोहरावे व आयुष्याचा आनंद घेऊन इतरांनाही देण्याचा प्रयत्न करावा असे सुचविणारे हे सर्व निसर्गाचे कार्य असते. निसर्ग नेहमीच राहतो. तो अनादी-अनंत आहे. सर्व लयाला जाते, पण निसर्ग राहतो. निसर्ग म्हणजे शक्ती, माया, देवता. तिच्यामुळेच पुन्हा सर्व सृष्टीची निर्मिती होते, त्यामुळे या आदिशक्तीची उपासना नेहमीच करावयाची असते. निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होणारा माणूस व्यक्तित्वाची संपन्नता जोपासतो. म्हणून आपले साधू, सत्पुरुष संसारी न बनता अखंड हिंडत राहिले. निसर्ग आदान-प्रदानाच्या बाबतीत समृध्द आहे. तो किती देतो व आपण किती घेतो याचा विचार प्रत्येकाने करावा. आंब्याला मोहोर येतो. हापूस आंबा तर बाजारात आलाही म्हणतात. कोकीळा कुहूssकुहू गाऊ लागते. निसर्ग तल्लीन होऊन डोलू लागतो. भारतातल्यासारखी ऋतूंची संपन्नता इतरत्र नाही. इंग्रजी काव्यात वसंत ऋतूचीच आळवणी दिसते. 'वर्डस्वर्थ' हा निसर्ग कवी म्हणून विख्यात. आपल्याकडे 'बालकवी'. ' तो रविकर का गोजिरवाणा आवडला अमुच्या राणीला?' - 'फुलराणी' ही एकच कविता जरी बालकवींनी लिहिली असती तरी ते अमर झाले असते. बालकवींना खूप कमी आयुष्य लाभले; पण आयुष्याच्या या लहानशा ओंजळीत ते निसर्ग भरभरुन प्यायले हे आपल्याला त्यांच्या कविता वाचताना जाणवते. जे आयुष्य वाटणीला आले आहे त्यात जास्तीतजास्त माधुर्य, गोडवा, तेज, ओज आणि एकूणच समृध्दता आणावयाची असेल तर नैसर्गिक परिपोषाशिवाय पर्याय नाही. कापूस हा नेहमी शुभ्रतेचे प्रतीक आहे. मऊतेचे प्रतीक, मांगल्याचे प्रतीक. वातीच्या रुपाने जळतो व आसमंत उजळून टाकतो. देवासमोर जळून दिव्यत्वाला पोचतो. आयुष्याचा कापूस असाच निरंतर तेवत राहावा यासाठी निसर्गासमोर लीन व्हायला पाहिजे व त्याच्या परिपोषकतेचा आस्वाद नित्य घेण्याने, इतरांनाही आपल्यापासून आपण काय देऊ शकतो याचा विचार मनात नेहमीच येत राहिला तर एकदिवस असा येईल की आपणही काही ना काही इतरांसाठी संप्रेरक मागे ठेवूच ठेवू! व्यक्तित्वाची उंची गाठण्यासाठी डोंगर-पठारांची उंची तर बघाल ना! नदीचा खळखळाट, वा-याचे वाहणे, फुलांचा सुगंध, फळांचे फळणे व आस्वाद, पशु, पक्षी, प्राणी यांचा निसर्गातील विहार ज्याला आनंदित करीत नाही अशी व्यक्ती आहे का? नाही ना! मग माणसाचे व निसर्गाचे हे अतूट नाते मनात ठसवून त्या शक्तीदेवतेला प्रसन्न करुन घेण्याची पराकाष्ठा करून, अनंताचा ध्यास घेऊन शिवशक्तीशी एकरुप होण्याची इच्छा करु या! आयुष्यातील हीनतेचा, मलीनतेचा, अशुद्धतेचा, स्वार्थाचा, दंभाचा, अभिमानाचा, वैफल्याचा, निराशेचा, दुःखाचा - एकूण सर्वच कोंडा, फोलपट काढून टाका हा संदेश देणारा हा निसर्ग - त्याची शक्ती तिला नमन करावेसे वाटते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हा निसर्ग व आपणही या पाच तत्वांपासून बनलेले. किती एकात्मता ती अनुभवू या!
संगीता पाटखेडकर.
२/२/२०१६
No comments:
Post a Comment