Sunday, 14 February 2016

हरहुन्नरी

व्यासांनी 'महाभारत' लिहावयाचे ठरविले, पण आराखडा खूपच मोठा! त्यांना लेखनिकाची जरुरत वाटली. एक मजेदार किस्सा यासंदर्भात सांगितला जातो. व्यासांनी गणपतीला बोलावले 'तू माझा लेखनिक हो' म्हणाले. व्यासांनी गणपतीला एक अट घातली. मी सांगेन ते, अर्थ समजून घेऊन लिहायचे मला मध्येच अडवायचे नाही. गणपती कबूल झाला. त्यानेही एक अट घातली. 'मी मुळीच थांबणार नाही, तुमचा ओघ खंडित व्हावयास नको'. किती मजेशीर! बुद्धिमत्तेच्या बाबतीत दोघेही धुरंधर. व्यासांचा ओघ खंडित झाला नाही गणपती कुशल लेखनिक म्हणून प्रसिध्द झाला. विचार मनात पक्के असल्याशिवाय मुखातून शब्द बाहेर पडणे कठीण हे तर महाभारतासारखे साहित्य-महाकाव्य- रामायण महाभारत ही दोन महाकाव्ये- यांची सर कुणालाच नाही. दोन महाकाव्यांची तुलना हा पुन्हा एक मोठ्ठा विषय! 'व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्' असे म्हंटले जाते. व्यासांनी व्यक्तिवैशिष्ट्यांचा आलेख व्यक्तिरेखांद्वारे रेखाटला आहे; तशा व्यक्तिरेखांव्यतिरिक्त मानवी स्वभाव सापडणे अशक्य! इतके मानवी स्वभावाचे विश्लेषण तज्ज्ञतेने करण्याची प्रतिभा असणारे व्यास! बुद्धीची अधिष्ठात्री देवता- गणपती- लेखनिक- अर्थ समजून भराभर लिहिण्याची कला त्याच्याशिवाय कुणाला अवगत असणार? असा 'समसमा संयोग की जाहला'.
सांगणे लिहिणे या दोन्ही कला साध्य करणे सोपी बाब नव्हे! ज्ञानेश्वरांचे लेखनिक- सच्चिदानंदबाबा, रामदासांचे- त्यांचे शिष्य, तुकारामांचे- त्यांचे शिष्य. वि.. खांडेकर डोळ्यांनी अधू, पण लेखनिक विद्यार्थी ठेवून कितीतरी कादंबऱ्या त्यांनी लिहून घेतल्या. कुणाचे हस्ताक्षर चांगले नसते म्हणून लेखनकामाठी केली जाते. बाळशास्त्री हरदासांची लेखनिका म्हणजे शांता मावशी हे आपणा सर्वांना माहितच आहे. सांगणारा लिहिणारा या दोघांचाही या प्रक्रियेत फायदा होत असतो. विचार उत्स्फूर्तपणे निवेदन करता-करता डोके सतत चालते राहते.  लिहिता-लिहिता लेखनाच्या विषयाचे सांगोपांग ज्ञान होऊन हात चालत राहतो. 'अमिन सयानी' हे 'सिलोन' रेडिओवर, दर बुधवारी, 'बिनाका गीतमाला' सादर करायचे. आवाज वाखाणण्याजोगा. लोकांना खूप आवडायचा. सादर करण्याची हातोटीही लोक नावाजीत. बुधवार रात्री ८ची वेळ रेडिओला कान लावून लोक बसायचे. त्यांची टि.व्ही. वरील एक मुलाखत पाहून मला नवल आश्चर्यच वाटले होते. ते म्हणाले, "लोक समोर आहेत असे समजून कार्यक्रम पेश करणे लोकांसमोर कार्यक्रम पेश करणे यात मला दुसरा प्रकार कठीण वाटतो, त्याची मला सवय नाही". बघा- दोन निवेदन पध्दती वेगळ्या झाल्या! म्हणून कुणीही मला ही कला अवगत तर दुसरी तर काय माझ्या हातचा मळ, असे मुळीच समजू नये. स्वगत, एकपात्री प्रयोग, एकांकिका, तीन तासांचे नाटक, तमाशा, लोकनाट्य, सिनेमा, सिरियल्स- हा प्रत्येक प्रकार वेगवेगळ्या अपेक्षा घेऊन आलेला असतो. नट झाला म्हणून तो या सर्व प्रकारांना योग्य न्याय देईलच असे नाही. त्यातही पु.. देशपांडेंसारखे हरहुन्नरी, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे कलाकारही असतात. गायक, वादक, संगीतकार, निर्माता, निर्देशक, नट, नाटककार, हास्यकलाकार या सर्वांवर हुकुमत असणे ही अतिप्रतिभेचीच बाब! एक एक पैलू अंगीकृत करायला खूप मेहनत घ्यावी लागते, तिथे सर्व येणे याला सलामच करावा लागतो. आज याहीबाबतीत खूप चढाओढीचा काळ आहे. काळ खूप वेगाने गतिमान होत आहे. आपल्यामधील अंगीकृत गुण शोधून ते जास्तीतजास्त चांगल्या पध्दतीने सादर करण्याची प्रवृत्ती हा आजच्या काळाचा विशेष म्हणावा लागेल! प्रत्येकाने उदाहरणे शोधा! शोधा म्हणजे सापडेल!
आज 'गीता' जयंतीचा दिवस
असा कोणताही ग्रंथ नाही ज्याची जयंती साजरी होते, म्हणून या ग्रंथाचा अभ्यास करावा. 'गीता' सांगणारा 'कृष्ण' सर्व कला ज्ञानाचा परिपूर्ण ठेवा. श्रीकृष्णाचे जीवन अभ्यासिले तर कितीतरी कलागुण ज्ञानसंग्रह आपण स्वतःमध्ये निर्माण करण्याची इच्छा जरुरच करु शकतो. बहुआयामी व्यक्तिमत्व निरंतर प्रेरणाकेंद्र असते.


      संगीता पाटखेडकर.

No comments:

Post a Comment