Wednesday, 17 February 2016

इतिहासाची सम्यक जाणीव

भारतीय ऐतिहासिक राजपुरुषांमध्ये मराठी धरुन भारतातील इतर काही आणि इंग्रजी धरुन भारतीयेतर भाषात सर्वात अधिक काव्ये, कादंबऱ्या, चरित्रे, नाटके वगैरे शिवाजीची झालेली आहेत. त्यांच्यावरील लेखकांमध्ये न्यायमूर्ती रानडे, महाकवी रविंद्रनाथ ठाकूर, सर जदुनाथ सरकार, अरविंद घोष प्रभृतींची गणना असून त्याचे चरित्र लिहिण्याचा संकल्प असणाऱ्यांमध्ये लोकमान्य टिळकांचे तात्यासाहेब केळकरांचे देखील नाव नमूद आहे; पण तो संकल्प सिद्धीस गेला नाही. शिवाजी किंवा अन्य कोण्या व्यक्तीचे चरित्र म्हंटले की त्या व्यक्तीचा खरा वृत्तांत आला पाहिजे अशी साहजिक अपेक्षा राहते, पण एक स्वतंत्र साहित्यप्रकार म्हणून श्रेष्ठ दर्जाची गुणवत्ताही हवी अशी अपेक्षा असते. असे शिवाजीचे चरित्र अजूनपर्यंत झालेले नाही अशीच आजपर्यंत सर्व टीकाकारांनी ग्वाही दिलेली आहे. चरित्र हा साहित्यप्रकारच नवीन असून तो आपल्या अंगवळणी पडलेला नाही. शिवाजी जसा महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे तसाच तो महाराष्ट्रातील राष्ट्रीय इतिहास संशोधनाचे उगमस्थान आहे. आपला इतिहास पाश्चात्यांनीच आधी लिहून काढला. ग्रँट डफमुळे रुढ झालेल्या शिवाजीच्या निंदेवर तोडगाशोधून काढण्याच्या खटाटोपातून स्वकीयांनी लिहून ठेवलेल्या बखरसाहित्याचा सुमारे २५-३० वर्षे अभ्यास झाला. नंतर अव्वल दर्जाचा पत्रसंग्रह अभ्यास पुढे ३०-४० वर्षे चालला. संकलनात्मक पायरीवरच हा अभ्यास राहिला! इतिहास ही एक अखंड चैतन्यमय जाणीव असते. डफच्या शिवाजीवर तर जागृत महाराष्ट्राने केव्हाच तिरस्काराने बहिष्कार घातला होता. डफची अपात्रता वि.का. राजवाड्यांनी उघडी करुन दाखविली. .मो. पुरंदरे, बाळशास्त्री हरदास यांनीही शिवाजीवर लिहिले. गो.. सरदेसाई, सर जदुनाथ सरकार वगैरे अभ्यासकांची यादी मोठी आहे. चरित्र लेखकाला काटेकोर कसोट्यांना उतरलेल्या विश्वसनीय साधनांची विपुलता आवश्यक असते आणि अशा साधनांचा योग्य उपयोग शास्त्रज्ञ रसिकतेने करण्याची हातोटी त्याच्यात असावी लागते. नेपोलियनसारख्या पाश्चात्त्य राजपुरुषांची शेकड्यांनी आणि एकापेक्षा एक सरस अशी चरित्रे होऊ शकली याचे कारण विविध प्रकृतीच्या लेखकांना तितक्या विविध दृष्टिकोनातून निवड करण्यास भरपूर अवसर देणारी विश्वसनीय साधनांची विपुलता! तशी विपुलता शिव चरित्र साधनांची नाही, असे अभ्यासक सांगतात. इतिहास संशोधन मंडळ - याकामी नेहमीच साथ देणारे आहे, पण विश्वसनीय साधनांचा उपयोग करु शकणारा रसिक सहानुभूतीचा शास्त्रज्ञ लेखक हा कपिलाषष्ठीचा योग जेव्हा जुळून येईल तेव्हाच उत्तम शिवचरित्र आपल्या हाती पडेल असे चोखंदळ वाचकांचे म्हणणे असते. अमेरिकेसारख्या देशात काही वर्षांपूर्वी अध्यक्षपदी गाजून गेलेल्या लिंकनसारख्या जगद्विख्यात व्यक्तीचे जन्मस्थान कोणते याविषयी अनिश्चयाचे बोलणे ऐकू येते. त्याचे अंतर्जीवन त्याच्या समकालीनांना एक महाकूट वाटे आणि आज तर त्यांचे स्मरण एखाद्या महाकाव्याच्या नवावलोकनासारखे अमेरिकनांना, फार काय सर्व जगातील मानवांना विस्मयाविष्ट करुन सोडते आहे, स्फुरण देत आहे. ही गोष्ट एखाद्या राजकारणी पुरुषासंबंधीची तर एखादा कालिदास वा भवभूती - कशाला एखादा केशवसुत वा बालकवी यांच्या चरित्राचा शोध आम्ही कसा घेणार? सांगायचा मुद्दा हा की चरित्रही लिहिणे सोपे नसते. योग्य ती माहितीही उपलब्ध नसते पूर्वग्रह ठेवता लिहिणारा लेखकही दुर्मिळ असतो. आत्मचरित्रकाराजवळ त्याची माहिती तर उपलब्ध असतेच, पण 'आत्म' हा इतका प्रिय असतो की स्वतःचे दोष, कमतरता, अवगुण, कमीपणा सांगताना तो शंभरदा विचार करेल लिहू की नको लिहू असे त्याला होते. त्यामुळे खरे 'आत्मचरित्र' अजून जन्माला यायचे आहे असे म्हणावेसे वाटते. चरित्रे-आत्मचरित्रे वाचून अनेक लोकांचे जीवनानुभव कळतात एवढे मात्र निश्चित! प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील -या-वाईट घटना लिहून ठेवण्याची सवय ठेवली तर त्याचा उपयोग सामाजिक इतिहास लिहिताना इतिहास संशोधकाला करता येईल. काहीही लिहून ठेवण्याची पूर्वी सवय नसल्यामुळे अनंत अडचणी उपस्थित झाल्या. निव्वळ आख्यायिका, दंतकथा यावरच इतिहासाचे घोडे पुढे सरकले. निश्चित 'कालनिर्णय' देता येणे अशावेळी अशक्य होते. पूर्वीपेक्षा काळ याबाबतीत बराच पुढे गेला आहे. खडान्खडा माहिती आज उपलब्ध होऊ शकते.
चरित्रे-आत्मचरित्रे वाचणे हे प्रगल्भतेचे लक्षण समजल्या  जाते. दडवा ना किती दडवता ते पण सांगण्याजोगते तर सांगा ना! त्याचाही फायदा समाज करुन घेईलच! केवळ सागरपृष्ठावर दिसणाऱ्या हिमनगांच्या क्षेत्रफळावरुन त्याच्या समुद्रपृष्ठाखालील अफाट विस्ताराचा वेध घेण्याचा प्रयत्न जितका निष्फळ तितकाच चरित्र-आत्मचरित्राचा वरवर वेध घेणे निष्फळच ठरणार!

       संगीता पाटखेडकर.

       १७//२०१६.

No comments:

Post a Comment