Sunday, 14 February 2016

फेकला तटाहुनि घोडा

राणी लक्ष्मीबाईला (झाशीची राणी) पाठंगुळी मूल बांधून घोड्याच्या द्वारेच तटावरून उडी घेता आली. किती तो घोडा आत्मविश्वासी प्रेरक! रथ आणि घोडे हे अनादी-अनंत आहेत असे वाटावे अशा  अनेक घटितांचे पुरावे आहेत. सूर्याच्या रथाला सात घोडे, अरुण सारथी हे तर सर्वश्रुतच आहे. सूर्यतेज दिसते, सूर्यदेवता नाही. सूर्याचा रथ, घोडे आणि सारथी आपल्या लौकिक दृष्टीला दिसत नाहीत. देव-दानवांचे युद्ध होत असे त्यावेळी दशरथ राजा देवांच्या साह्यासाठी जात असे. दशरथाचा रथ अटकला त्यावेळी कैकेयीने हात घालून तो सावरुन धरला हे उल्लेखही जाणकार जाणतातच. राम हा त्रेतायुगातील! कृष्ण द्वापारयुगातील! राम-रावणाच्या युध्दात राम जमिनीवर उभा राहून रावणाशी युद्ध करत होता, मग इंद्राने रामासाठी रथ पाठविला असे उल्लेख आढळतात. कृष्ण अर्जुनाचा सारथी. अर्जुनाच्या रथाला चार घोडे दाखवतात. राजकन्यांचे लग्न झाल्यानंतर त्यांच्यासोबत हत्ती, घोडे, रथ, दास, दासी, रत्न, माणिक, हिरे वगैरे दिले जात असे, असेही उल्लेख आहेत. घोड्यांच्या पागा असून घोड्यांची निगा राखल्याशिवाय तो उमदा प्राणी माणसाला कठीण परिस्थितीत मदत कशी करणार? मग तीही सर्व व्यवस्था असणारच! गड, किल्ले, शिवाजी महाराजांच्या काळातील उल्लेख बघितले तर घुडसवारीच्या द्वारेच बरेच पल्ले गाठले जात होते. शिलेदाराला घोडा देण्यात आला तर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असे. मला घोडा हा प्राणी फार आवडतो. घोडा हे सामर्थ्याचे प्रतीक. रथ आणि घोडा या प्रतिमा 'वेग' सुचविणा-या आहेत. 'मनाची गती' ही वा-याच्या गतीपेक्षाही श्रेष्ठ, उच्च आहे; म्हणून 'मनोवेगाच्या वारुवर स्वार व्हा' म्हणजे सा-या विश्वात भ्रमंती करता येईल, अशी वाक्ये सुचू लागतात. Horse-Power सर्वश्रेष्ठ. घोडा दामटणे, घोडा पिटाळणे असे शब्दप्रयोग इतिहासात खूप दिसतात. इतिहास हा घोड्यांचा साथी आहे. घोडा हा अत्यंत इमानी प्राणी! घोड्यांच्या रेसेस् लावल्या जातात. शिवाजी राजाबरोबरच त्यांचा घोडाही प्राणत्याग करता झाला. त्या घोड्याचे स्मारकही प्रतापगडावर आहे. इंद्राचा घोडा 'उच्चश्रवा'. शिवाजीचा 'चेतक'. सूर्याच्या घोड्यांची नावे शोधून काढायला हवीत. घोडनवरा, घोडाबग्गी, घोडमी असेही शब्दप्रयोग प्रचलित आहेत. गाय ही आपल्या संस्कृतीत अत्यंत पूज्य पवित्र मानली जाते. ३३ कोटी देवांचा निवास तिच्या पोटात! शेण गोमूत्र सुद्धा पवित्र, रोगपरिहारक समजले जाते. सगळे विषाणू नाहीसे करण्याचे सामर्थ्य त्यात असते. दूध तर पौष्टिक. गायीच्या कानात बोलले की आपल्या संवेदना पितरांपर्यंत पोहोचतात असे म्हणतात. श्रीकृष्ण गुराखी. गायी, गवळणी, दही, दूध, लोणी, ताक, विषय खूपच व्यापक. गोधन सर्वात महत्वाचे समजले जात असे. बैल तर शेतीसाठी अत्यंत उपयुक्त म्हणून पोळा साजरा करतात. माणसांनी प्राण्यांच्या उपयुक्ततेचा फायदा करुन घेऊन त्यांचे पोषण करून संस्कृती समृध्द केली. कुत्रा इमानी. चोरांपासून संरक्षण व्हावे म्हणून पाळतात. दत्ताला कुत्रा फार प्रिय. सर्वात मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी. युधिष्ठिराबरोबर त्याचा कुत्राही स्वर्गदारापर्यंत गेला म्हणतात. उंदीर - गणपतीचे वाहन. देवळांमधून सोन्याचे, चांदीचे, पितळेचे उंदीर असतात. त्यांच्या कानात इच्छा बोलल्या तर त्या देवापर्यंत पोहोचतात म्हणे! अश्वमेध राजसूय यज्ञात जो घोडा अडवेल तिथे युद्ध व्हायचे जिंकले तर घोडा पुढे जायचा. अशा पद्धतीने जिंकत गेले तर तो राजा सर्वश्रेष्ठ. भूमी, हत्ती घोडे धनही महत्वाचे मानले जाई. दगडांनाही देव मानणारी आपली संस्कृती. तिथे या सर्वांवर माणूस प्रेम करणारच!

      संगीता पाटखेडकर.

      ३१//२०१६

No comments:

Post a Comment