काही विषय मनातून जाता जात नाहीत. बी.ए. ला असताना मराठी लिटरेचर, फिलॉसॉफी, सायकॉलॉजी हे विषय घेतले होते. तीनही विषय अत्यंत आवडीचे! 'बिंझाणी' महिला महाविद्यालयाची एक पद्धत होती. तिमाही व सहामाही परीक्षांमध्ये प्रत्येक विषयात Highest Marks मिळविणा-याला एक उत्तम पुस्तक बक्षीस दिले जायचे. या तीनही विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल मला नेहमीच बक्षिसे मिळाली. विषय बक्षीस मिळाले हा नाही. विषय खूप आवडीचे असल्यामुळे एम.ए. ला कोणता विषय निवडायचा हा प्रश्नच पडला. बाबा म्हणाले, "फिलॉसॉफी नको घेऊस, तुझे लग्न होणार नाही, तत्त्वज्ञान सांगणारा कोणाला नकोच असतो, सायकॉलॉजी घेऊ नकोस, लोक वेडा समजतात."
लिटरेचर तर प्रिय होतेच, शेवटी ते घेतले. पण म्हणून बाकीचे दोन विषय मनातून कधी गेलेच नाहीत. परीक्षेसाठीच थोडी अभ्यास असतो! परीक्षा हे फक्त एक प्रमाणपत्र असते. आयुष्याचे प्रमाणपत्र तुम्ही सा-या आयुष्यात कसे वागले यावरच मिळणार! ते कुणी देण्याची आवश्यकता नाही. तत्वज्ञान आयुष्यात मुरले व माणसे समजण्याची कला अंगी बाणत गेली. साहित्य तर नसानसातून वाहायला लागले. खरेच प्रत्येक विषयाचा आवाका किती मोठा! ज्ञानासारखा आनंद नाही, हे नेहमीच उमगत होते आणि रुची वाढतच होती. आयुष्य अपुरे पडते! एका जन्मात कितीसे साध्य होणार? ज्ञानपिपासा शमत नसते. अनंत विषय, अनंत ध्यास व अत्यानंद! कोणत्या मार्गाने जावे हा व्यक्तीसमोरचा नेहमीचा प्रश्न आहे. दोनच पर्याय असले तर ज्या मार्गाने गेलो तिथे काय घडले हे तुम्ही सांगू शकता, पण जो मार्ग अवलंबिला नाही त्या वाटेने गेलो असतो तर! काय झाले असते? - हे नेहमीच अंधारात राहते आणि त्या मार्गाचे आकर्षण कधी संपत नाही. आई-वडीलांची इच्छा असते मुलाने डॉक्टर, इंजिनियर व्हावे! पण मुलाची इच्छा असते नट होण्याची. त्यासाठी मुलगा पळून जाऊन कलाकार होतो अशीही उदाहरणे आढळतात. पण त्यासाठी त्याला अनेकांचा रोष पत्करावा लागून कुटुंबाशी फारकत झालेली असते. लता मंगेशकरांना एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्याच्या इतिकर्तव्यतेविषयी, साफल्याविषयी विचारण्यात आले होते. त्यांना असे साफल्य नको होते असे त्या म्हणाल्या! लग्न होऊन संसार करण्याची त्यांची इच्छा होती. पुढच्या जन्मी असे एकाकी आयुष्य नको होते त्यांना! आयुष्याच्या जोडीदारासंबंधीचा निर्णय - हा फार मोठा प्रश्न! संसार सुखाचा होण्यासाठी जोडीदार समजदार असणे अत्त्यावश्यक. हा प्रश्न फार गुंतागुंतीचा. संसार यशस्वी होण्यावर मुलांचे भवितव्य अवलंबून राहणार! एका निर्णयात अनेक निर्णय दडलेले असतात. अनेक पर्याय तुमच्यासमोर आहेत, त्यातील एकच निवडायचा आहे तर गुंतागुंत अधिकच वाढते. जो पर्याय निवडू, त्यानंतर पुढे काय होणार हे अज्ञातच असते, पण त्या वाटेने जावे लागते. निर्णय तुमचा असतो. बाकी कोणीही त्याची जबाबदारी कशाला घेईल? ज्याचे ओझे त्यानेच वहायचे असते! स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी ज्याने त्याने स्वतंत्रपणे पेलली तर दुःख व्हायचे कारण नसते. निर्णयक्षमता व जबाबदारीची जाणीव हे फार मोठे गुण आहेत. आयुष्य हा एक तराजू आहे. निर्णय नेहमीच घ्यावे लागतात. निर्णय व यशस्विता हे दोन पारडे. 'पासंग' कसा झुकेल सांगता येत नाही. दोन्ही पारडे समतोल राहतीलच असे नाही. तुळशीचे पान घालून कृष्णाची तुला रुक्मिणीने पूर्ण केली. प्रत्येकाला अशी रुक्मिणी कुठून मिळणार? जेव्हा जेव्हा जे निर्णय घेतले - त्या वाटेने जे जे सामोरे येईल त्याला तोंड देणे - हेच आणि हेच फक्त तुमच्या हाती आहे. दुःख कशाचे? कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असे करुन चालणार नाही. स्वतःचा क्रूस स्वतःच वाहायचा असतो हे येशू ख्रिस्ताने शिकविलेच आहे. असे स्वावलंबी असणे कठीण जरी असले तरी अंती खूप समाधान देणारे आहे.
संगीता पाटखेडकर.
१२/२/२०१६.
No comments:
Post a Comment