Sunday, 14 February 2016

'टाकीचे घाव घातल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही'

एखादा शिल्पकार दगडाची निवड करुन (हे पूर्णपणे लक्षात घ्या) (दगडाचीही निवड करावी लागते) त्यातून सुंदर मूर्ती निर्माण करतो. शिल्पकारही प्रविण असावा लागतो. मग जी कोणती मूर्ती त्याने घडविली असेल, देवाची, देवीची, मानवाची त्यानुसार त्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते. दगडाचा एकेक कण ढवळून निघतो, तेव्हा आकार येतो. हा वाच्यार्थ
अभिधा- प्रयत्नाने-अथक, कडक, निश्चित प्रयत्नानेच कोणतीही गोष्ट सफल, साकार होऊ शकते
हा लक्षितार्थ-लक्षणा! त्या साकार प्रयत्नांना देवत्व प्राप्त होण्यासाठी जी दिव्यता अंगीकृत करावी लागते ती तर मुळीच फक्त प्रयत्नांवर अवलंबून नसते तर सर्वस्व पणाला लावावे लागते तरच 'नराचा नारायण' होऊ शकतो. हा व्यंग्यार्थ - व्यंजना!
'प्रयत्नांती परमेश्वर', 'यत्न तो देव जाणावा', 'केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे' (रामदास).
आधी केलेचि पाहिजे हे तर खरेच पण आधी केले मग सांगितले ही वृत्ती वायफळ निष्फळता माणसात येऊ देत नाही कारण कार्य बोलके असते. वाचणे, लिहिणे, बोलणे यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला जास्ती महत्व आहे. नाहीतर 'गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता' म्हणण्याचीच वेळ येणार! ज्या कोणी हा वाक्प्रचार प्रचलित केला असेल त्याने निश्चितच खूप कंटाळून, रागावून हे शब्द उच्चारले असतील! गाढवाला तरी कशाला दोष द्या? तो जे करतो, निमूटपणे बिचारा, दुगाण्या झाडतो, ओझी वाहतो - ते सुध्दा खूप कठीण आहे. कदाचित गीता त्याच्यासमोर वाचली तर त्याच्यातही काही ना काही फरक पडत असेलच तो आपण जाणू शकत नाही. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदविलेच की! भिंत चालविलीच की
'मूकं करोति वाचालं l
पंगुं लंघयते गिरीम्' l
यत्कृपा तमहं वंदे l
परमानंद माधवम् l - ही ताकद फक्त त्या देवालाच! शिळेतून अहिल्या निर्माण करण्याचे सामर्थ्य रामाच्या पदस्पर्शातच! देवही जेव्हा अवतार घेतो तेव्हा पूर्वीच्या कमीतकमी आठ पिढ्या त्यादृष्टीने संस्कारित असाव्या लागतात
'रघुकुल रीत सदा चली आयी
प्राण जायी पर वचन जायी'
हे रघुकुलाचे वैशिष्ट्य होते म्हणून 'राम',- दशरथाने कैकेयीला दिलेले वचन पाळू शकला! दशरथ तर देव-दानवांच्या युध्दात देवांना पूर्वीपासूनच मदत करीत आला होता. तरीही त्याला पुत्रकामेष्ठी यज्ञ करुन अग्नीदेवाला प्रसन्न करुन पायस मिळवावे लागले तेव्हा अवतारी पुरुष निर्माण झाले. जिजाईला 'शिवाजी' घडवावा लागला. त्या कार्यात तुकाराम, रामदास यांचेही मोलाचे योगदान आहे. निष्ठावान, सामर्थ्यसंपन्न 'मावळे' हेही तितकेच महत्वाचे! 'सीता' आहे म्हणून रामाच्या जीवनाला अर्थ आहे. सीतेने त्याच्या जीवनाला परिपूर्णतेचा आकार मिळवून दिला. लक्ष्मण-ऊर्मिला, भरत, शत्रुघ्न, हनुमान हे सर्वजण या प्रक्रियेला खूप साह्यभूत ठरले. द्रौपदीमुळे महाभारत घडले. दुष्टांच्या नायनाटासाठीचे महत्वपूर्ण कार्य होण्यासाठी द्रौपदी प्रेरक! सगळे पांडव या मनस्वी स्त्रीमुळे - त्यांच्या अंगच्या गुणांना जास्ती प्रभावीपणे सादर करु शकले. 'गीते'ची निर्मिति झाली. कृष्णानेही नंदकुळात जन्म घेतला नाही. तिथे त्याचे संगोपन झाले फक्त! जन्म वसुदेव-देवकीच्या पोटी. वसुदेवाचे कुळ या अवतारासाठी पूर्वी आठ पिढ्या सिध्द होत होते म्हणतात. शबरी ही मातंग ऋषीची मानसकन्या! ती रामाला उष्टी बोरे खायला घालून प्रसिध्द झाली असे नाही. भिल्लीण असलेली शबरी सिध्द तपस्विनी होती. जंगलात राहूनसुध्दा ज्ञानसाधना करीत होती. रामकार्यामध्ये ऋषींचे जे सहकार्य मिळाले त्यात शबरीचा वाटा सिंहाचा होता
राम-शबरी भेट ही फक्त रामाचे महत्व वाढविण्यासाठी बघावयाची नाही तर तिला 'राम' दिसावा ही तिची सिध्दता होती. जीवनात 'साध्य' मिळविण्यासाठी 'सिध्द' असावे लागते तरच 'असाध्य' 'साध्य' होते. प्रत्येक विषय खूप मोठ्या आवाक्याचा! ज्याने त्याने स्वतःची उदाहरणे निवडून विषयाला बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यास हरकत नाही. 'असाध्य ते साध्य करीता सायास कारण 'अभ्यास' तुका म्हणे'. हि-याला पैलू पाडावे लागतात. सोने, चांदी, प्लॅटिनम यांचे दागिने बनविण्यासाठी कितीतरी कलाकौशल्याची गरज असते. मोती शिंपल्यात एकदम तयार होत नाही. घडलेल्या निर्मिति बघा-किती आनंद होतो ते!  या जागृततेने जीवनाचा आस्वाद घ्या. आनंदाची खाण हिरेच हिरे निर्माण होतील


    संगीता पाटखेडकर.

1 comment: